मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
औरंगाबाद - मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता तसेच आता आपण कोरोना विषाणू उच्चाटनासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत येथील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यातही आपल्या सर्वांचा सहभाग हवा, असे सांगून त्यांनी औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही बोलून दाखवला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. या ठिकाणाहूनच त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छापर संदेशातून मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या भूमीसाठी अनेक आबालवृध्दांनी चिवटपणे लढा दिला आहे. या भूमीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा मराठवाडा कसा पेटून उठतो त्याचे हे एक प्रतीक हा आजचा दिवस आहे.
अन्यायाविरुद्ध लढणे व तो मोडून टाकणे हे आपल्या भूमीचे, मातीचे वैशिष्ट्ये आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व त्यांचे सहकारी तसेच अनेक अबालवृद्ध मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांच्यामुळे आपण हा आजचा दिवस पाहू शकत आहोत. या शुरवीरांची आजची पिढी ही त्यांचे वारसदार आहेत. तोच वारसा घेऊन आपण हा मराठवाडा जपला पाहिजे आणि विकसितही केला पाहिजे.
ठाकरे म्हणाले की, एका बाजूला मोकळा श्वास आणि दुसऱ्या बाजूला तोंडावरती मास्क. मला खात्री आहे की, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अबालवृद्धांनी ज्या पद्धतीने रझाकारी अत्याचार मोडून टाकला त्यापद्धतीनेच आपण कोरोना आक्रमणही परतवून लावूया. कोरोना विषाणू विरुद्ध आपल्याला लढायचे आहे.
मराठवाडा जिद्दी, चिवट, हिम्मतवंतांचा आहे. मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सरकारने निश्चितपणे घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृद्ध होणार आहे.
मुंबई, पुण्याला ज्याप्रमाणे विकास प्राधिकरण आहे त्या पद्धतीने औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, सुखसमृद्धीसाठी निश्चित प्रयत्न करीन, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.