नवी दिल्ली - संसदेतील तीसपेक्षा जास्त खासदारांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळण्याची चिन्हे दिसत आहेत. हे अधिवेशन पुढील आठवड्यांच्या मध्यावर संपवले जाऊ शकते, संसदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंबंधी शनिवारी लोकसभेच्या कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीस सर्व पक्षांचे नेते, सरकारचे प्रतिनिधी व लोकसभाध्यक्ष यांची उपस्थिती होती.
बहुतांश नेत्यांनी संसदेचे १४ सप्टेंबरपासून सुरू झालेले अधिवेशन १ ऑक्टोबरपूर्वी संपवण्यास सहमती दर्शवली आहे. यावेळी पावसाळी सत्रात कपातीचा अंतिम निर्णय संसदीय कामकाजविषयक कॅबिनेट समिती घेईल, असे सांगण्यात आले. लोकसभेत कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक व एक वर्षांसाठी खासदारांचे वेतन-भत्ते ३० टक्के कपात करण्याच्या विधेयकास मंजुरी देण्यात आली.
यंदाच्या सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रल्हाद पटेलसह अनेक खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. संसर्ग झालेल्या खासदारांनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळवण्यात आले आहे. यामुळे काही विरोधी पक्षांनी १८ दिवसांचे अधिवेशन जोखमीचे असल्याचे सांगून हे अधिवेशन लवकर संपवावे, असे सरकारला सांगितले. तसेच काही सत्ताधारी खासदारही याला सहमत आहेत.