कबीर खडा है बाजारमें..

कश्वीच्या शाळेत आज एक दोहा अर्थासह सांगायचा आहे.तिच्या शाळेत असे बरेचसे अभिनव उपक्रम असतात... मी तिला संत कबीरांचा दोहा अर्थासह सांगितला. कबीर. माझ्या गुरुस्थानी मानलेल्या गुरुंपैकी एक. जातीपातीची चढण आणि उतरंड ही जनमाणसांची कालही डोकेदुखी होती आजही आहे. हाडामासांच्या माणसांचा माणसाला 'बाट' कसा होऊ शकतो, हे इथल्या समाजव्यवस्थेचे दुखणे आहे.


एका विर्याच्या थेंबातून मानवी सृष्टीची रचना झाली तिथे कोण उच्च आणि कोण नीच. ? असे खडे सवाल आपल्या दोह्यातून मांडून स्पृश-अस्पृश्यतेची सामाजिक दरी निर्माण करणाऱ्या धर्ममार्तंडांना डागण्या दिल्या. संत कबीरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही.. 

कोण म्हणतं त्यांना तीन पत्नी होत्या. एक मुलगा होता..कमाल नावाचा. 'डुबा वंस कबीरका उपजा पूत कमाल', असा एक दोहा आहे. समाजातील अनिष्ट चाली आणि रुढी परंपराविरोधी शब्दांची तलवार चालवणारे क्रांतिकारी संत कबीर हाच त्यांचा परिचय...!

संत कबीरांचा एक प्रसिद्ध दोहा...

झिनी, झिनी, झीनी, 
झीनी चदरिया,
दास कबीर जतन सो 
ओढी जस की तस...
धर धीनी चदरिया....!!!

या रचनेत चादर या शब्दाचा प्रयोग शरीरासाठी प्रतिकात्मक रुपात करण्यात आला आहे. त्यांच्या सर्वच रचनांमध्ये गहन अर्थ आहेत. 

चिटी चावल ले चली
बीच में मिल गयी दाल
कहे कबीर दो ना मिले 
इक ले डाल...

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी खुष झाली. एकावेळी तिने दोन्हीही दाणे उचलण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते शक्य झाले नाही आणि मुंगी खिन्न झाली. एकावेळी दोन गोष्टी मिळत नाही. 

एक गोष्ट मिळवणासाठी दुसरी गोष्टींचा त्याग करावा लागेल. तांदळाचा दाणा मिळालेलं मुंगीचे समाधान डाळीच्या एका कणाने हिरावून घेतले. आपलही तसचं आहे न.. जोवर विकल्प उपलब्ध नसतो. तो माणूस आहे त्या गोष्टींत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले की ते आपला आनंद आणि समाधान हिरावून घेतात. 

हिंदूनं की हिंदवाई देखी
तुरकन की तुरकाई
कहत कबीर सूनो भई 
साधो दौड राह न पाई..

जातीपातीच्या भेदावर हे असे खडे बोल सुनवणारे कबीर क्रांतिकारक संत म्हणावे लागतील. हल्ली लोकांच्या आपआपल्या धर्माच्या भावना टोकदार झाल्या आहेत.बाळगा हो धर्माभिमान फक्त दुसऱ्यांच्या धर्माला तुच्छ नका मानू. हीच विनंती. शेवटी संत कबीरांच्याच भाषेत म्हणेन, 

कबीर खडा है बाजारमें
सबकी मांगे खैर
न काहू से दोस्ती
न कांहू से बैर
शुभास्ते पंथान संतु....!!!!

 - स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !