नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी मुक्त पत्रकार राजीव शर्मा याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. शासकीय गोपनीयता कायद्यांतर्गत पत्रकारासह अटक केलेल्या इतर दोघांत चीनची एक महिला आणि नेपाळचा एक नागरिकाचा देखील समावेश आहे आहे. शर्मा याने चीनच्या गुप्तचरांना भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सीमेबाबत भारताची रणनीती, लष्कराची तैनाती आणि रसदेबाबत त्याने अत्यंत संवेदनशील माहिती चीनच्या गुप्तचर संस्थांना पुरवली होती. तो ईमेल व सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही माहिती देत होता. या प्रकरणात कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे देण्याच्या आरोपात चिनी महिला आणि तिच्या नेपाळी सहकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
प्रत्येक माहितीसाठी ७३ हजार रुपये दिले जात होते. याप्रमाणे त्यांनी दीड वर्षात ४० लाख मिळाले, असे पोलिसांनी सांगितले आहे. स्पेशल सेलचे डीसीपी संजीवकुमार यादव म्हणाले, संरक्षणाच्या विषयांवर अनेक माध्यम संस्थांसह चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्येही शर्माचे लेख प्रकाशित झाले आहे. शर्मा चीनच्या गुप्तचरांसोबत २०१६ पासून संपर्कात होता.
शर्मा याच्या चिनी गुप्तहेर अधिकाऱ्यांसोबतच्या संपर्काचाही भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शर्माला एक माहिती पुरवण्यासाठी सुमारे १ हजार डॉलर्स म्हणजेच ७३ हजार रुपये मिळायचे. दीड वर्षात हेरगिरीसाठी त्याला ४० लाख रुपये मिळाले आहेत. केंद्रीय तपास संस्थांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारावरून या पत्रकाराला १४ सप्टेंबरला अटक झाली आहे.
दिल्लीतील त्याच्या घरातून संरक्षणविषयक अनेक दस्तऐवज देखील जप्त करण्यात आले आहेत. यावरुन चीन भारतात हेरगिरी करण्यासाठी कोणाचा वापर करु शकते हे दिसून येत आहे. तसेच चीनने अशी हेरगिरी करण्याचे कारण काय, हेही आता स्पष्ट होत आहे. दरम्यान, शर्मा यांच्या अटकेमुळे माध्यमक्षेत्राील अनेकांना धक्का बसला आहे.