टेक्नॉलॉजी - अनेकांना एकत्र आणण्याचे, हवे तेव्हा संवाद साधण्याचे सोपे माध्यम म्हणून Whats App ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या चाहत्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी Whats App ने वेळोवेळी बदलही केले आहेत. आता हे अप एक नवे फीचर घेऊन येत आहे. त्यामुळे हे अप आणखीनच पसंतीला उतरणार आहे. यावेळी होणाऱ्या बदलाद्वारे आता ठराविक काळानुसार आपोआप आधीचे मेसेजस डिलिट होणार आहेत.
व्हॉट्स अप वर Expiring messages द्वारे चॅट्समध्ये एक ठराविक कालावधीनंतर संदेश आपोआप डिलीट होतील. यापूर्वी हे अप वापरकर्त्यांना मोबाइल मध्ये प्रत्येक चॅटबॉक्समध्ये जावून ते डिलीट करावे लागत होते. तसेच डिलीट ऑल मेसेजेस करावे लागत होते. परंतु, हे करताना बराच वेळही वाया जायचा. शिवाय अनेक मेसेजेस साचल्यामुळे या अपचा वेगही आपोआप मंद व्हायचा. पण आता हे करण्याची आवश्यकता नाही.
कारण हे अप वापरकर्त्यांना आता आपल्या सोयीनुसार हे फीचर सुरू किंवा बंद करता येणार आहे. तसेच काही ग्रुप चॅटमध्ये हे फीचर केवळ ग्रुप तयार करणारा हँडल करु शकणार आहे. बाकी सदस्यांना त्याचा अधिकार असणार नाही. या वेळमर्यादेमुळे एक दिवस, एक आठवडा आणि एक महिना असे पर्याय दिले जाणार आहेत. आता हे नवे फीचर वापरकर्त्यांना पसंतीस पडते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.