'ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट' सूत्र वापरा अन् कोरोना पळवा

शिर्डी - कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

जे नागरिक नियम पाळत नाही त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे. कोरोना रोखण्यासाठी संगमनेरमध्ये ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संगमनेर येथे कारखाना कार्यस्थळावर कोरोना उपाययोजनांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्षल तांबे, डॉ. सचिन बांगर, सुरेश शिंदे, पोलीस निरिक्षक अभय परमार, डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदिप कचोरिया आदि यावेळी उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसानंतर राज्यात मिशन बिगीनअंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांबरोबर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. 

हा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याची सवय लावावी. संगमनेरमध्ये टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून ‘थ्री टी’ फॉर्मुल्यानुसार ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच या संकटात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन करतांना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार तांबे म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी कोरोना योद्धा म्हणून काम करतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्कचा वापर याबरोबरच स्वत: मधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्यांचा समावेश असलेला सकस आहार घ्यावा. प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद असून नागरिकांनी गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी प्रांतधिकारी शशिकांत मंगळूरे यांनी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !