मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एका मंत्र्यांनी डॉक्टरांना अजब सल्ला दिला आहे. करोनाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णावर करोनाचे उपचार सुरू करा, असा अजब सल्ला या मंत्र्यानी दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा सल्ला दिला आहे.
मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी करोना मृत्यूदरावर चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील करोनाचा मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशयिताच्या रिपोर्टची वाट न पाहता त्यांच्यावर उपचार सुरू करा. करोनासदृश्य लक्षणे दिसताच रुग्णावर करोनाचे उपचार सुरू करा, असा अजब सल्ला त्यांनी दिला.
जिल्ह्यात घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करा, अँटिजेन टेस्टची संख्या वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, कोल्हापुरात आतापर्यंत १२ हजार १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३१२ जणांचा आतापर्यंत करोनाने मृत्यू झाला आहे. परंतु, त्यांच्या अजब सल्ल्यामुळे वैद्यकीय अधिकारीही चिंतेत पडले आहेत.
एखाद्या रुग्णाला केवळ करोनाची लक्षणे दिसत असेल पण तो कोविड पॉझिटिव्ह नसेल तर त्याच्यावर करोनाचे उपचार केल्यास रिअॅक्शन होणार नाही का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मुश्रीफ यांनी असा सल्ला का दिला, यावर अद्याप ठाकरे सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. (image source : TWITTER)