इयत्ता दहावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तूर्तास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यानंतर कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम भरले जात आहेत. मात्र, प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे जोडणे बंधनकारक केलेले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका ताब्यात मिळाव्यात, याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी गुणपत्रिका वेळेत मिळाव्यात या हेतूने काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रिका पोच केल्या जातील, असे एसएससी बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.