महाराष्ट्रातील 'या' सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली - घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू राहूल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खोखोपटू सारिका काळे आणि टेबलटेनिसपटू मधुरिका पाटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना आज वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सहा अर्जुन पुरस्कार, तीन ध्यानचंद पुरस्कार, एक द्रोणाचार्य पुरस्कार, एक तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी  पुरस्कार आणि तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्यप्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर विज्ञान भवनातून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. 

यावेळी देशाच्या विविध भागातून सहभागी क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थाना गौरविण्यात आले महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना यावेळी गौरविण्यात आले. 

सहा खेळाडुंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

सुभेदार अजय अनंत सावंत यांना घोडेस्वारीतील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुभेदार सावंत यांनी 2016 मध्ये इजिप्त येथे आयोजित टेंट पिगींग, सोर्ड पिगींग आणि लान्स टेंट पिंगींग या घोडेस्वारी प्रकारात भारत देशाला सुवर्ण पद‍क मिळवून दिले. तसेच, अबुधाबी येथे 2018 मध्ये आयोजित विश्व चषक स्पर्धेत टेंट पिगींगमध्ये रजत पदक पटकावून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे .

नौकानयनपटू दत्तू बबन भोकनाळ यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. 2016 मध्ये आयोजित रियो ऑलम्पिक स्पर्धेत एकल नौकानयन प्रकारात त्यांनी 13 वे स्थान प्राप्त केले होते, हा कीर्तीमान करणारे श्री. भोकनाळ हे पहिले भारतीय ठरले. एशियन गेम 2018 आणि एशियन चँम्पियनशिप 2015 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

कुस्तीपटू राहुल आवारे यांना कुस्तीतील उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील उत्कृष्ट पहेलवानांमध्ये समावेश असलेल्या राहुल आवारे यांनी 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.  2019 मध्ये आयोजित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक, सिनियर एशियन चँम्पियनशिप 2019 आणि 2020 मध्ये कास्य पदक मिळवून देशाचा बहुमान वाढविला आहे.

पॅरा स्वीमर सुयश नारायण जाधव यांना जलतरणातील उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित एशियन पॅरा क्रीडा स्पर्धेत बटर फ्लाय (50 मीटर) प्रकारात सुवर्ण पदक, फ्रिस्टाईल (50 मीटर) प्रकारात कांस्य पदक आणि इंडिव्हिज्वल मेडले (200 मीटर) प्रकारात कांस्य पदक पटकाविले.

खोखोपटू सारिका काळे यांना उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.  2016 मध्ये आयोजित दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये इंग्लड येथे आयोजित जागतिक खोखो स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. 52 व्या सिनियर नॅशनल चँम्पियनशिप स्पर्धेमध्येही त्यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.

टेबलटेनिसपटू मधुरिका सुहास पाटकर यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक. 2019 मध्ये आयोजित राष्ट्रकुल चँम्पियनशिप स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक आणि एकल स्पर्धेत रजत पदक पटकावून भारत देशाला बहुमान मिळवून दिला आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !