कान्हा..!

कान्हा

तुझी किती रुपं..
विश्वरुपात तु, कालीया मर्दनात तु..
राधेच्या डोळ्यात तु.. मीरेच्या अभंगात,
आईच्या अंगाईत तु
माझ्या मनातला बुध्दीवंत तु
गीतेसारखी ज्ञानगाथा देणारा तु, 
मोरपीसासारखा तलम विविध रंग.. 
उलगडून दाखवणारा..
देवकीला.. यशोदेला..
पुत्र म्हणून अभिमान असणारा..
गरीब पेंद्या, सुदामा, गोपगोपिकांबरोबर.. 
शिदोरीचा गोपाळकाला खाऊन समता शिकवणारा..
कुब्जेकडून चंदनलेप घेणारा तुच नारे 
कान्हा !


मोठी असलेली प्राणप्रिय राधेची 
अन् तुझी अशरीरी अमर प्रेम कथा तुझीच
फक्त तुझीच ना रे कान्हा...
याज्ञसेनीला कुठल्याही नात्यात न बांधता 
सखी मानून स्त्रीपुरुषांचं मैत्र सुरु करणारा तुच कान्हा...
नरकासुराचा वध करताना 
पत्नी सत्यभामेला सारथ्य देऊन 
समानता सुरु करणारा तुच कान्हा...
बंदीगृहातून सोळा सहस्त्र स्त्रियांना सोडवून 
स्त्री मुक्तीचा पाठ देणारा तुच कान्हा..
सोळाव्या वर्षी न्यायासाठी 
सख्या मामाचा वध करणारा तुच कान्हा...
सत्य.. न्याय.. करताना सगासोयरा पाहू नका, 
असा कर्मयोग अर्जुनाला शिकवणारा तुच कान्हा..
तुझं तत्वज्ञान आजच्या काळातही योग्य आहे, 


पण आमचं एक चुकलयच कान्हा...
तू एक न्यायनिष्ठ, पराक्रमी, 
सहृदय माणूसपण जपणारा राजा होतास 
हे विसरुन आम्ही तुझी मंदिर उभी करत गेलो..
फक्त गोपींची चेष्टा करणारा...
राधेवर प्रेम करणारा..
दहीहंडी खेळणारा..
असा तू कान्हा..
अशी तुझी प्रतिमा बनत गेली 
अन् आम्ही तुझी पूजा करत गेलो....
खरतर कान्हा गरज आहे 
तुझ्या तत्वांना आचरणात आणायची...
स्त्रियांना तुझ्यासारखा सखा हवाय..
समानता देणारा पती हवाय..
जन्म न देणाऱ्या मातेला 
यशोदामैय्या म्हणून अमर करणारा 
पुत्र हवाय..
न्यायासाठी लढायला बळ देणारा 
मार्गदर्शक हवाय..
आंधळे भक्त होऊ नका..
न्यायाने वागणारे माणूस व्हा..
असा संदेश देणारा कान्हा...
तूच हवास.....
वाट बघतोय कान्हा...
येशील ना????

- © स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !