मुंबई - शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये भाजपच्या विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत मिळत नाही. किंवा केंद्र सरकारची सहकार्याची भावना देखील नाही. याचा परिपाक म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती.
‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा शिकवला आहे.
काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहे, असा खोचट टोमणाही शिवसेनेने मारला आहे.
सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.