मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दररोज वेगवेगळे वळण घेत आहे. तपास राहिला बाजूला, आता या प्रकरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूण शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहून आता शिवसेना नेते संजय राऊत मैदानात उतरले आहेत.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. तर सर्व आरोपांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. आदित्य यांच्याविरोधात राजकारण करणार्यांना त्यांनी खणखणीत इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. या सगळ्या घटनेशी आदित्य यांचा काय संबंध, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ आहेत. हे सरकार अस्थिर करू शकले नाहीत या वैतागातूनच आदित्य यांच्यावर हे आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरेंना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वेळ आल्यावर हे सगळं करण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.