मुंबई - 'अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे होते, यामुळेच सुशांत नाराज होता', असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सुशांतचे चुलत बंधु आणि भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांनी कायदेशीर नोटिस पाठवली आहे. राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यावर ४८ तासात माफी मागावी, अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावर ख्रासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले की, 'मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल'. 'मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे.
सुशांतचे कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करत आहेत. काय करायंचं ते आम्ही आणि सुशांतचे कुटुंब पाहू. इतर माध्यमांनी यात बोलायचे काम नाही,'' असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. यापूर्वी नोटिस आल्याचे समजल्यानंतर संजय राऊत म्हणाले होते की, "अशा हजारो नोटिस मला रोज येतात. मी वस्तुस्थिती पाहून बोललो आहे. मी याप्रकरणी कोणत्याच प्रकारची माफी मागणार नाही."
(image credit : TWITTER/ANI)