मुंबई - एकीकडे महाराष्ट्रावर कोरोनाचे अस्मानी सुलतानी संकट चालून आले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी आपापले वैर विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. पण, राज्यात सरकार विरुद्ध भाजप असा सामना जनतेला पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. अन् अशातच शिवसेनेचे एक मंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जातात, हे वृत्त अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे.
भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडलेली नाही. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात पहिल्यांदाच शिवसेने नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहेत.
परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परब यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. आज विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार केल्याचीमाहिती अनिल परब यांनी दिली.
तसेच या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे परब यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची खमंग चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.