शिवसेना शहर प्रमुख काटे यांचे साकडे , करोना कहर थांबेना
शेवगाव (जि. अहमदनगर) - शहर व तालुक्यात covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मोठ्या संख्येने नागरिक करोनाग्रस्त होत आहेत. करोनाच्या वाढत्या कहरापासून शेवगावकरांना वाचविण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख सिद्धार्थ काटे यांनी तहसीलदार अर्चना पागिर यांना साकडे घातले आहे.
काटे यांनी निवेदनात म्हटले आहे कि, प्रामुख्याने करोनाचा वाढता विळखा लक्षात घेता आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कशा उपलब्ध करून घेता येतील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
तसेच काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागामध्ये कोविड सेंटर प्रभावी ठरतील असे सांगितले आहे. या धर्तीवर प्रत्येक गावांत कोविड सेंटर निर्माण करून वेगाने यंत्रणेला प्रशिक्षित करावे. शेवगाव शहरांत करोने ग्रासलेल्या लोकांना सेवा देण्यासाठी रुग्णालय उपलब्ध नाही. या परिस्थितीत लाखोंचा निधी खर्च करून प्रशासनाने प्रत्येक गावांमध्ये उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयांचा वापर करता येईल का, याचा देखील विचार व्हावा.
आज शहरांमधील गर्दीचे ठिकाण व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सामुहिक दृष्टीने उपाययोजना करता येतील, असा विश्वास वाटतो.
यावेळेस तालुकाप्रमुख ऍड. अविनाश मगरे, शिवसेना शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, युवा सेना प्रमुख शितल पूरनाळे, महेश पुरनाळे, उदय शेठ गांगुर्डे, कानिफ कर्डिले, महेश मिसाळ, कृष्णा बोंबले, तन्वीर पठाण, गणेश पोटभरे, संजय उगले, गणेश ढाकणे ज्ञानेश्वर धनवडे, महिला आघाडीच्या कोमलताई , ऍड. अतुल लबडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे
खाजगी रुग्णालये, मंगल कार्यालये ताब्यात घ्या
आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले आहेत. हा धागा पकडून शेवगाव शहरासह तालुक्यामधील बोधेगाव, चापडगाव, दहिगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, अमरापूर, खरडगाव, लाडजळगाव या मोठ्या गावांमधील खाजगी रुग्णालये मुंबईच्या धर्तीवरती ताब्यात घ्यावेत. मुख्यमंत्र्यानी तसे आदेश दिले असल्याने हे आता शक्य आहे. याशिवाय शेवगाव शहर भोवतालची खाजगी मंगल कार्यालये देखील विलगीकरणासाठी वापरता येतील.
नारीशक्तीला काय अवघड ?
जगातील सर्वात मोठी संकटेही नारीशक्ती समोर खुजी आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या प्रमाणे आपणही आपल्या अधिकारांचा वापर करून भविष्याचा विचार करून काही तरतुदी कराव्यात. आपल्या या प्रामाणिक प्रयत्नाना लोकसहभाग देखील लाभेल. जो या संकटात उपयोगी पडणार आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारे राज्य असल्याने रयतेसाठी शासकांच्या मनात नेहमीच संयम, आपुलकी, जिव्हाळा वेळप्रसंगी शिस्त या सर्वच गोष्टींचा समावेश असावा. भविष्यातील वाढता धोका लक्षात घेता आपणास जागरूक करणे ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून माझे कर्तव्य मानतो, असे काटे यांनी म्हटले आहे.