अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील कृष्णाभाऊ फुलमाळी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात इमामपूर येथील खिरणीच्या योगेश्वर महादेवाला मोठा भंडारा आयोजन केले जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन महादेवाला अभिषेक करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत केडगाव येथील सावली प्रकल्पातील मुलांना मिष्टान्न भोजनाचा शिधा देण्यात आला.
नगर औरंगाबाद हायवेपासून अवघे २ किलोमीटर आत असलेले इमामपूर परिसरातील खिरणीचे योगेश्वर महादेव मंदिर आणि परिसर रिमझिम बरसत असलेल्या श्रावणसरींमुळे हिरवाईने नटलेला आहे. असा हा नयनरम्य परिसर योगेश्वर महादेवाच्या भक्तांना आकर्षित करणार नाही तर नवलच. योगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आणि नयनरम्य परिसर पाहण्यासाठी, शुद्ध हवा घेण्यासाठी, तसेच मनशांती अनुभवण्यासाठी भाविक येथे येतात.
कृष्णाभाऊ फुलमाळी मित्र मंडळ, शंभो बॉईज ग्रुपचे युवक आणि योगेश्वर महादेवाचे भक्त दरवर्षी येथे मोठ्या महाप्रसादाचे आयोजन करतात. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून अनाथ, निराधार आणि वंचित घटकांना मदतीचा हातही दिला जातो. यंदा जमावबंदी आदेशाचे पालन करत भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करता आले नाही.
त्यामुळे शासकीय नियमांचे पालन करुन मोजक्याच युवकांनी मंदिरात विधिवत पूजा अर्चना केली. योगेश्वर महादेवाच्या पिंडीवर आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आणि दिव्यांची मनोहारी सजावट करण्यात आली. महादेवाची विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन करण्यात आले. यानंतर युवकांनी त्यांच्या घरी बनवलेला प्रसादाचा शिधा 'सावली प्रकल्पा'तील मुलांना सुपूर्द करण्यात आला.
लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याने सध्या या प्रकल्पात ४७ मुले-मुली आहेत. कृष्णाभाऊ फुलमाळी मित्र मंडळ आणि शंभो बॉईज ग्रुप, तसेच योगेश्वर महादेवाचे शिवभक्त सचिनभाऊ फुलमाळी, विकास फुलमाळी, भारत कापसे, सदानंद पिसाळ, गुलाब फुलमाळी, अमोल शेजवळ, मनोज झगरे, सोमनाथ बारगळ, विनायक खोजे, अजय चौधरी, प्रताप फुलमाळी, अमोल वडागळे, आदींनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
मुलांच्या आठवणी ताज्या
गेल्या वर्षी श्रावण महिन्यात शिवभक्त कृष्णाभाऊ फुलमाळी यांनी योगेश्वर महादेव मंदिरासमोर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरात योगेश्वर महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी कीर्तन सोहळा, महाप्रसाद वाटप करण्यात आले. सुमारे ४ ते ५ हजार भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सावली प्रकल्पातील सुमारे ७० मुला-मुलींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
सामाजिक बांधिलकीचा वसा
गेल्या वर्षी श्रावण महिन्यात शिवभक्त कृष्णाभाऊ फुलमाळी यांनी सावली प्रकल्पातील सर्व मुलांना आर्थिक मदत दिली होती. नगरमधील शाळेला बेंचेस देण्यात आली. अन 'युवान' संस्थेतील एका महाविद्यालयीन युवतीच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. "दुसऱ्यांच्या वेदना जाणून जो मदतीला धावून येतो, तो खरा शिवभक्त", अशा शब्दात भाविकांनी कृष्णाभाऊ फुलमाळी यांचे कौतुक केले होते.