हे काय ! 'सडक २'वर लाेकांची सडकून टीका ?

मनोरंजन - प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी पटकथा.. कर्णमधूर गाणी आणि श्रवणीय संगीत.. संजय दत्तचा जबरदस्त अभिनय.. पूजा भटची अदाकारी.. आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्या 'भट्टीत' सन १९९१ मध्ये तयार झालेला 'सडक' हा सिनेमा त्यावेळी सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमाने महेश भट यांना उंचीवर नेऊन ठेवले. अजूनही त्या 'सडक'चे असंख्य चाहते आहेत. पण, महेश भट यांच्याच दुसऱ्या 'सडक'वर मात्र प्रेक्षक सडकूून टीका करताना दिसत आहेत.

सन १९९१ मध्ये महेश भट यांच्या दिग्दर्शनातून जन्माला आलेला 'सडक' हा सिनेमा अफाट लोकप्रिय ठरला होता. त्याकाळी संवेदनशील विषयावर बेतलेल्या या सिनेमाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. संजय दत्त, पूजा भट, दीपक तिजोरी यांच्यासह सदाशिव अमरापूरकर यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या. सदाशिव अमरापूरकर यांना तर उत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. या भूमिका आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत.

'टॅक्सी ड्रायव्हर' या मूळ अमेरिकन सिनेमाचे हे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांना अफाट आवडले. त्याला कारणही तसेच होते. समीर यांनी लिहिलेली आणि कुमार सानू, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गाणीही रसिकांनी डोक्यावर घेतली. 'तुम्हे अपना बनाने की कसम खायी है', 'हम तेरे बिन कही रह नही पाते', 'रहने को घर नही, सोने को बिस्तर नही', 'जमाने के देखे है रंग हजार', ही गाणी आजही रसिकांना भुरळ घालतात.

महेश भट यांनी आता या सिनेमाचा सिक्वल आणला आहे. नुकताच डिझनी हॉटस्टारवर या 'सडक २'चा ट्रेलर रिलीज झाला. पुन्हा एकदा संजय दत्त, पूजा भट यांच्यासोबत आलिया भट, रोहित रॉय कपूर व गुलशन ग्रोव्हर या सिनेमात झळकणार आहेत. पण, या सिनेमावर प्रदर्शनापूर्वीच फॅन्स सडकून टीका करताना दिसत आहेत. असे काय झालेय की प्रेक्षक या सिनेमावर आणि भट यांच्यावर टीका करत आहेत.‌‌?

डिझनी हॉटस्टारच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या सडक २ ट्रेलरच्या पोस्टवर फॅन्सच्या निगेटिव्ह कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या सिनेमावर बंदी घाला. महेश भटचे सिनेमे पाहू नका, संजय दत्त, भट यांना बॉयकॉट करा, बॉलीवूडमध्ये घराणेशाही जपणाऱ्या दिग्दर्शक व कलाकारांना बॉयकॉट करा, अशी मागणी फॅन्स कमेंटमधून करत आहेत. तर संजय दत्तचे काही चाहते त्याचे समर्थन करत आहेत.

का होतेय टीका ? 

बॉलीवूडमधील अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा अलीकडेच संशयास्पद मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असलेल्या या प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडमधील मोठमोठ्या दिग्दर्शक व कलाकारांवरही आरोप केले जात आहेत. बॉलीवूडमधील घराणेशाहीवरही टीका होत आहे. त्यातूनच 'सडक २'वर सडकून टीका होत असल्याचे दिसून येत आहे. 

महेश भट घराणेशाही जपणारे आहेत. संजय दत्त जेलमधून बाहेर आलेला आहे. अशा लोकांच्या सिनेमावर बंदी घालायला पाहिजे, असे म्हणत प्रेक्षक सिनेमावर अक्षरश: तुटून पडले आहेत. पहिल्यांदा असे झाले आहे की, युट्युब व ट्विटरवर या सिनेमाच्या ट्रेलरला लोक डिसलाईक मोठ्या प्रमाणात करत आहेत. हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या निगेटिव्ह प्रतिसादाचा कितपत फरक पडतो, हे लवकरच कळेल.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !