अहमदनगर - रोटरी कोविड केअर सेंटर मधून आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ३५१ वा रुग्ण ठणठणीत बरा होऊन बाहेर पडला. संपूर्णपणे विनामूल्य असलेल्या या कोविड कोरोना केअर सेंटरमध्ये रोटरीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती रफिक मुंशी यांनी दिली. या केंद्रात नुकताच दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
१२ तारखेला कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सेंटर मधील रुग्णांनी सोशल डिस्टन्सचे नियमांचे पालन करत दही हंडी फोडली. आणि ही हंडी फोडायचा मान सर्व रुग्णांनी एका महिलेला देऊन एक सामाजिक संदेश या निमित्ताने दिल्याची भावना गीता गिल्डा यांनी व्यक्त केली.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिना निमित्ताने या सेंटर मध्ये तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन साजरा करण्यात आला, या प्रसंगी किशोर डोंगरे, शिरीष रायते आदी मान्यवर उपस्थित होते.रुग्णांची मानसिक स्थिती आणि सेंटर मधून बाहेर पडल्यावर पुढील २१ दिवस घ्यायची काळजी या संदर्भात डॉ. सतीश राजूरकर यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
आपल्या देशावर, शहरावर, समाजावर आलेले हे कोरोना च्या संकटाशी आपल्याला एकत्र येऊन लढा द्यावा लागणार असून, सरकार, प्रशासन शक्य तेवढ्या उपाययोजना करीत आहे, परंतु जनतेने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून पुढील काही दिवस पराकोटीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत क्षितिज झावरे यांनी दिले.
संपूर्ण विनामूल्य चालवल्या जाणाऱ्या या सेंटरच्या आणि रोटरी किचन च्या मदतीसाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे यावे असे आवाहन अमित बोरकर यांनी यावेळी केले.
या सेंटरसाठी धान्य, किराणा अथवा इतर स्वरूपात देणगी स्वीकारल्या जातील. हे सेंटर यशस्वी रित्या चालवण्यासाठी ईश्वर बोरा, निलेश वैकर, पुरुषोत्तम जाधव, दिगंबर रोकडे, सुयोग झंवर देविका रेळे, प्रतिभा धूत, परिमल निकम यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती प्रसन्ना खाजगीवाले यांनी दिली आहे.