अयोध्या - अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले.अअन् दुसऱ्याच दिवशी श्री रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या सहापट वाढली आहे. गुरुवारी रामलल्लाची मूर्ती मोठ्या प्रमाणात सजवण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे सध्या येथे बंधने घालण्यात आलेली आहेत. त्यामुळे रोज सुमारे ५०० भाविक येत हसेते. गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत ३००० लोकांनी दर्शन घेतले.
तर हनुमानगढीत ८ हजार लोकांनी दर्शन घेतले. सकाळी दर्शन घेणाऱ्यांमध्ये येथे ड्यूटीवर आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. दरम्यान, ट्रस्टने मंदिराच्या पायाभरणीत ठेवलेल्या पवित्र शिळा आणि इतर साहित्य विधिपूर्वक सुरक्षित ठेवले आहेत. पायाभरणीसाठी उभारलेला मंडप आणि सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्यानंतर शनिवारपासून मंदिराच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मंदिराचे काम सुरु केल्यानंतर अगोदर पाया खोदला जाईल. सध्या पाऊस सुरु असल्याने हे काम मंद गतीने होऊ शकते. यांनतर पायाभरणी आणि तळमजल्यापर्यंतचे काम पूर्ण होण्यास १८ महिने लागू शकतात. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण होण्यास १४ ते १८ महिने लागतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर मंदिराचे काम पूर्ण होण्यास सुमारे साडेतीन वर्षे लागतील, असे सांगितले जाते.