'ऑफ द रेकॉर्ड'
झोपेलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करायचं? अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याचा सरळ अर्थ एवढाच आहे की जाणीव नसलेल्या व्यक्तीच्या जाणिवा एकवेळ जाग्या करता येतील. पण जाणीव असूनही दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींच्या जाणिवा कशा जाग्या करायच्या ? असो, मुद्द्यावर येऊ.
जगभरात कोरोनाने थैमान घातलंय.. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटना आणि प्रत्येक देशातील प्रशासन जीवाची बाजी लावून या संकटाचा सामना करतेय. परंतु नेतेमंडळींना नेमकं काय करावं, हे तीन महिने होऊन गेले तरी अजून उलगडलेले नाही. अनेक जण आपापल्या घरात (घाबरून) क्वारणटाईन झालेले आहेत. सर्वसामान्य जनतेला ज्यांच्याकडून अपेक्षा असते, तेच गायब झाल्यावर लोकांनी दाद मागायची कोणाकडे ?
अशाच एका आटपाट नगरीत एका प्रधानाची नेमणूक झाली. काहीही झालं तरी सत्तेत राहायचं, म्हणून त्याने मध्यस्तीकरवी राजाच्या पायावर लोटांगण घातले. राजा दिलदार. राजाने प्रधानाला स्वीकारून चांगली प्रतिष्ठा देखील दिली. अर्थात राजाही हुशार होता. अगदी असंच कशाला कुणाला घेईल ना तो? मग राज्याच्या विकासाकरिता निधी म्हणून त्यानेही या प्रधानाकडून 'बिदागी' वसूल केली.
तरीही प्रधानाला हवी असलेलं पद काही वाट्याला आलं नाही. असो, जे मिळालं ते पदरात पाडून घ्या, म्हणून प्रधान गप्प राहिला. राजाने प्रधानाला त्याच्या घरापासून कोसो दूर अंतरावर असलेल्या एका प्रांताचा प्रधानसेवक म्हणून नेमले. राजाचा हेतू हा की बघुयात प्रधानाला खरच राज्याची काळजी आहे की स्वतःची. या प्रधानाने आधीच्या सत्तेत असूनही त्याच्या प्रांतात काही दिवे लावलेले नव्हते. त्याला वाटलं इतक्या लांब लावले तरी कोणाला त्याचं कौतुक ?
प्रधानाने त्या प्रांताचं पालकत्व घेतलं. दोन चार महिने होऊन जरा कुठे घडी बसत नाही तोच या कोरोना महामारीने थैमान घातलं. झालं, सरकारने घराबाहेर यायचं नाही म्हणून आदेश काढला, अन प्रजा बिचारी गपगुमान घरात बसून राहिली. पण किती दिवस असंच बसणार? पोटाची खळगी भरायला बिचाऱ्या जनतेला कष्टच करावे लागतात.. या जनतेने आपल्या पालक प्रधानाकडे याचना सुरु केल्या..
पण पाहतात तो काय? प्रधानच गायब ! झालं, प्रांतात वाऱ्याच्या वेगाने वार्ता पसरली. प्रधान कुठेय, प्रधान कुठेय? आता ज्याच्या भरवशावर राजाने त्या प्रांताची जबाबदारी सोपवली तो प्रधानच गायब म्हटल्यावर काय करायचं? इकडे प्रधानाला समजल की आपण बिळात (सॉरी, आपल्या घरात) लपून बसलोय, हे राजाला आणि प्रजेलाही कळलंय. आता काय करायचं?
अन याच गडबडीत प्रधानाने जाहीर केले की त्याचा घरात कोरोना घुसलाय. आता ही वार्तादेखील वेगाने पसरली. म्हणजे इतके दिवस प्रधान कुठे होता, ते राहिले बाजूला, अन शोधाशोध सुरु झाल्यानन्तर त्याचा निरोप आला की घरात कोरोना आलाय म्हणून मी घरातच बसलोय. बाहेर आलो तर माझ्यामुळे इतरांना लागण होईल. आता काय करायचं ?
बिचारी गोरगरीब प्रजा. त्यांना खरं ते काय कळून चुकलं. पण तक्रार करायची तरी कोणाकडे ? एकीकडे जनतेचा कैवारी असलेला राजा रात्रंदिन प्रजेची काळजी वाहतोय आणि दुसरीकडे त्याचे प्रधान मात्र घरात लपून बसले. बरं, शंका घेऊनही उपयोग नाही. जवळ जाऊन थोडंच कोणी खात्री करणार आहे, की प्रधानाला नेमकं काय झालंय.. म्हणून प्रधानाचं स्पष्टीकरण खपलं देखील..
पण राजा हुशार, त्याहून राजाची प्रजा हुशार. प्रधानाच्या घरातूनच ब्रेकिंग न्यूज बाहेर आली की प्रधानाला काहीही झालेलं नाही. हा सगळा बनाव आहे. असो, तर प्रधान झोपलेला नव्हता, त्याने फक्त झोपेचं सोंग घेतलं होतं हे सत्य समोर आलं. आता राजा त्यावर काय भूमिका घेतो, याकडेच सगळ्या प्रजेचं लक्ष लागून आहे.