अहमदनगर - शहरातील मानाचे गणेश मंडळांनी यंदा गणेशउत्सव विना मंडप, विना गर्दी, अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला आहे. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांनी पुढाकार घेत रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्वच मानाच्या मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा शब्द देत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले.
नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, माळीवाडा येथील बैठकीत आधी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. कोतवाली पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत शहरातील मानाचे गणेश उत्सव साधेपणाने व विना मंडप साजरे करण्या बाबत पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांनी आवाहन केले होते. त्या अनुषंगाने नगर शहरातील ग्राम दैवत श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा येथे मानाच्या मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माळीवाडा गणेश मंडळाचे अध्यक्ष अभय आगरकर, ऋषिकेश कावरे, निलेश खरपुडे, सुनील जाधव, अंकुश ढूमने, मनीष साठे, रवींद्र जपे, स्वप्नील घुले, शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विशाल भागानगरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर उत्सव प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशाप्रमाणे करण्याचे एक मताने निर्णय घेण्यात आला आहे.