नेवासा - तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरुन जाऊ नये. सर्वांनी शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. यापुढे शनिशिंगणापूर येथे उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती देखील गडाख यांनी दिली आहे.
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला नामदार शंकरराव गडाख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व कोरोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.
यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत नेवासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी तालुक्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली. तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाय योजना करण्याच्या दुष्टीने सूचना केल्या. मंत्री गडाख यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.
या बैठकीला उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे, मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.