नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शनिवारी धोनीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितले की, "तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी ७. २९ पासून मला निवृत्त झालो असल्याचे समजा". विशेष म्हणजे धोनीने निवृत्तीची घोषणा करताच क्रिकेटर सुरेश रैना यानेही त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.
भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून देणाऱ्या 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीने इंस्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या सेमी फायनलपासून महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरलेला नाही.
हेही वाचा : अन्यथा धोनीसाठी ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सन २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना सन २०१९ मध्ये विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला. त्यानंतर तो पुन्हा मैदानात दिसलाच नाही.