मुंबई - लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी यापूर्वी भरमसाठी पैसे मोजावे लागत हाेते. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत होता. परंतु, आता कोरोना' चाचणीच्या शुल्कात ६०० रुपयांची कपात केली आहे. स्वतः प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास यापूर्वी २५०० रुपये लागत होते. आता त्यासाठी फक्त १९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
काेराेना चाचणीसाठी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांमध्ये तब्बल साडेचार हजार रुपये आकारले जात होते. पण त्यामुळे रुग्णांची लूट हाेत असल्याची बाब समोर आली हाेती. त्यामुळे आराेग्य मंत्री डाॅ. राजेश टाेपे यांनी गंभीर दखल घेऊन हे दर २५०० ते २८०० रुपयांपर्यंत खाली आणले. आता पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचणी दरात कपात करण्याचा निर्णय सरकारने ७ अाॅगस्ट राेजी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने शिफारस केलेल्या आणि विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या अँटिजन व अँटिबॉडी चाचण्यांच्या वापराबाबत तसेच खासगी प्रयोगशाळांना दर निश्चित करून देण्यासाठी पुन्हा शासन स्तरावर समिती गठित करण्यात आली. या समितीकडून नवा मसुदा तयार करण्यात आला.
आता असे असतील नवीन दर
प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास
आरटीपीसीआर : १९०० रुपये
अँटिजन टेस्ट : ६०० रुपये
अँटिबॉडी टेस्ट : ४५० ते ५०० रु.
हॉस्पिटल, कोविड केंद्रावरून स्वॅब घेतल्यास
आरटीपीसीआर : २२०० रुपये
अँटिजन टेस्ट : ७०० रुपये
अँटिबॉडी टेस्ट : ५०० ते ६०० रु.
लॅबने घरी जाऊन स्वॅब घेतल्यास
आरटीपीसीआर : २५०० रुपये
अँटिजन टेस्ट : ८०० रुपये
अँटिबॉडी टेस्ट : ६०० ते ७०० रु.