वेदना महापुराच्या..

र्षभरापूर्वी महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा महाप्रलय आला आणि होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत अवघा महाराष्ट्र या दोन जिल्ह्यांच्या मदतीसाठी तत्परतेने धावला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून विविध स्वरूपातील मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक, राजकिय आणि जवळपास सर्वच क्षेत्रांतील संघटना आघाडीवर होत्या. आम्हीसुद्धा श्रीगोंदा येथून काही मदत घेऊन सांगली जिल्ह्यातील अशा दोन गावांत मदतकार्य केले होते जिथे अजिबात मदत पोहोचली नव्हती. 


तिथली एकंदर परिस्थिती पहिल्यानंतर कितीतरी दिवस मला झोप आली नव्हती.तिथे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले अनेक प्रसंग आजही मनाच्या कप्प्यात जसेच्या तसे कोरले गेलेले आहेत ते आठवून आजही अंगावर शहारे उभे राहतात. मागच्या वर्षी या दोन जिल्ह्यांत अतीवृष्टीमुळे आलेल्या महापुराची तिव्रता बातम्या आणि सोशल मिडियावरून समजत होती. सतत मदतीचे आवाहन करण्यात येत होते. हे पाहून आपणही या लोकांसाठी काहीतरी करावे हा विचार समोर आला. 


शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव मदत पोचवावी असे ठरले. आम्ही सोशल मिडियावरून आवाहन केले आणि अनेकांनी रोख रक्कम तर काहींनी वस्तु स्वरूपात मदत दिली.त्यातुन दोन महिने पुरेल इतके खाद्य पदार्थ आणि किराणा, पाणी बाॅटल, मेडीसीन,कपडे,जळावू लाकुड या वस्तुंचे किट बनवले. पुढचे आव्हान हे होते की, जमा झालेल्या सर्व गोष्टी गरजूंनाच मिळाव्यात आणि तिथल्या लोकांना फायदा व्हावा, असे वाटत होते. कारण काही ठिकाणी अतिरिक्त मदत पोहोचली आहे. तर काहीजण पुर्णपणे मदतीपासून वंचित असल्याच्या बातम्या समोर येत होत्या आणि त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचेही लक्षात आले. 


गावातली स्थानिक नेतेमंडळी प्रत्यक्ष गरजुंपर्यंत मदत पोहोचू देत नव्हते. त्यामुळे आम्ही तिथल्या लोकांशी प्रत्यक्ष बोलून ही मदत आम्ही स्वतः गरजुंच्या हाती घरोघर जाऊन सुपुर्द करणार असा आग्रह धरला. त्यांनी तो मान्य केला. मग आम्ही मदत घेऊन १६ ऑगस्टच्या २०१९ च्या रात्री सांगलीकडे निघालो. आम्ही जसे जसे सांगलीच्या हद्दीत प्रवेश करत होतो तसे हळहळत होतो. कारण या पावसाच्या पुराने अनेकांचे संसार उद्धवस्त केले होते. जागोजागी मृत जनावरे आढळत होती. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. 


१७ ऑगस्टला सकाळी बिचुद या गावी पोहोचल्यावरसुद्धा फाउंडेशनच्या टिमने प्रत्यक्ष गरजूंना भेटून पाहणी केली, त्यांच्या व्यथा, दुःख समजून घेतले. पाहणी केल्यावर त्या घटनेची गंभीरता लक्षात आली. प्रचंड नुकसान झालेले.. शेती व गुरे ढोरे यावर अवलंबून असलेली परंतु सद्य परिस्थितीतही अतिशय संयमाने वागणारी माणसे पाहिली. हे गाव पूर्णपणे पाण्यात होते आणि तिथली बिकट परिस्थिती पाहताना ह्या लोकांवर काय बितली असेल याची कल्पना करणेही कठीण होते. 


त्यांची गाळाने माखलेली अंगणे , वस्तू , घराच्या भिंती , बारा दिवसांनंतरही गच्च भिजलेली अंथरूण पांघरूण गाद्या भरभरून बोलत होत्या. ही मदत पोहोचवण्याआधी तिथल्या ज्या तरूणांशी आम्ही संपर्क केला होता. त्यांनी गावातील गरजू कुटुंबांची यादी बनवली होती आणि पुर्णवेळ आमच्या सोबत फिरून मदतीचे वाटप करण्यासाठी आम्हाला मोलाचे सहकार्य केले होते. मदतकार्य आटोपल्यानंतर लक्षात आले या तरूणांच्या घरी आपण मदत पोहोवलीच नाहीये. विचारणा केल्यावर समजले, त्या तरुणांनी मुद्दाम त्यांच्या घरी नेले नव्हते . त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आम्ही देऊ केलेली मदत त्यांनी नम्रपणे नाकारली. केवढे हे औदार्य!!


पुरामध्ये या लोकांची घर-दारे आणि संसार जरी वाहुन गेला असला तरी माणुसकी मात्र त्यांच्यात जिवंत होती. कारण आमची गाडी गावात पोहोचताच लोक अक्षरशः गाडीमागे धावत होते. एकजण सांगत होता 'सर या लोकांच्या घरात वर्षभर पुरेल इतका किराणा भरून झाला आहे. आम्ही मात्र अजून वंचित आहोत. तरीपण आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही.' जेव्हा आम्ही गावात फिरून पाहणी केली तेव्हा हे खरे असल्याचे जाणवले. 


आम्ही मोठ्या प्रमाणात उबदार कपडे आणि स्त्रियांसाठी साड्या घेऊन गेलो होतो. पण सर्वजण शिस्तीने रांगेत उभा राहुन गरज असेलेलेच तरच कपडे घेत होता. तिथून दुसर्या गावी अमनापुर येथे गेलो हे गाव कृष्णा नदीच्या गावी असल्याने पुराचा तडाखा जास्तच जाणवत होता. तिथल्या लोकांच्या नजरेत डोकावून पाहिलं तर आम्हाला काही बोलायची गरजच भासली नाही. कारण नैसर्गिक आपत्तीचा बसलेला फटका त्यांच्या मनावर घाव घालू शकला नव्हता. महाराष्ट्रातून आलेल्या मदतीबद्दल हे लोक भरभरून बोलत होते. 


तिथल्या आया-बाया , लहान लेकरांच्या नजरेत वेगळाच कृतज्ञतेचा भाव दिसत होता. संदिप नाझरे नावाच्या एका लेखकाच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांचे सर्व हस्तलिखित लिखाण आणि त्यांना पुरस्काररुपी मिळालेली असंख्य पारितोषिके आणि सन्मानपत्रे अक्षरशः गाळामध्ये रूतुन बसली होती तरीही हा माणूस आम्हाला स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सगळा परिसर फिरवून दाखवत होता. 


इथून जाताना काही इतर नकारात्मक गोष्टींही वाचल्या, ऐकल्या होत्या की भरपूर साठा करून घेतायेत वगैरे वगैरे.. पण जिथे योग्य नियोजन नसेल तिथे ते होणारच. अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यांच्यात आत्मविश्वास भरून स्वाभिमानाने उभा करायचा आम्ही प्रयत्न केला. अनेक मित्रांनी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन वरती विश्वास ठेवून स्वतःच्या फाटक्या आयुष्यातून वेळ काढून घेतलेलं कष्ट व बाकीच्या लोकांनी त्यांच्या घामाच्या पैशातून केलेल्या मदतीचं चीज झालं होतं. 


आम्ही पुरग्रस्तांच्या मनावर फुंकर घालण्याचा मदकार्यरूपी छोटा प्रयत्न केला होता याचे मोठे समाधान आजही जाणवते. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाले. तिथल्या लोकांना आम्ही केलेल्या छोट्याशा मदतकार्याचा मोठा आधार मिळाला होता, हे फोनवरून सांगताना तिथल्या लोकांचे डोळे आजही पाणावतात.

- सोमेश शिंदे (घारगाव, श्रीगोंदा, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !