आज भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन. १५ ऑगस्ट १९४७ रोजी अगणित शहिदांच्या बलीदानाने, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने मिळालेले अमोल स्वातंत्र्य.! 'पंधरा ऑगस्ट' आणि 'सव्वीस जानेवारी' या दोन दिवशी पहाल तर सारे शहर, सोशल मिडिया सारेच देशप्रेमाच्या मेसेजनी फोटोंनी भरुन जातात. जागोजागी देशभक्तीच्या गाण्यांनी शहर दुमदुमत रहातात. जिलेबी खात आम्ही हे दिन साजरे करत रहातो.
हे दोनच दिवस देशप्रेम जागृत असणाऱ्या लोकांचा देश आहे की काय, अशी शंका येऊ लागते. देशप्रेम आपल्या रोमारोमात असावं लागतं. पण वेगवेगळ्या पक्षाचे गुलाम असलेल्या आपल्या पांगळ्या मानसिकतेला कोण काय करणार? घरातील कचरा झाडूच्या फटका-याने स्वच्छ करता येतो पण डोक्यात साठलेल्या कच-याचं काय ?
एखादी घटना घडली की देशप्रेम उफाळून येते. मग मोर्चे, दंगल करायला एकही विधायक काम न केलेल्या हातांना भारी चेव येतो. देशातील संपत्ती जाळणे, फोडणे यात काय विकृत आनंद मिळतो देवच जाणे. देशप्रेम ही भावना अष्टोप्रहर आपल्या हृदयात तेवत राहिली पाहिजे. एखाद्या दिव्याप्रमाणे आपल्याला प्रकाशमान करत.
केवळ मी भारतीय आहे म्हणून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे महत्त्वाचे. पण लक्षात घ्या *कर्तव्यातील प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व आहे, पार पाडण्याला नाही. आता कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छताकर्मी, पोलिस दल आणि प्रशासन दिलों जानसे काम करत आहेत. हेच देशप्रेम आहे.
महात्मा गांधी, नेहरु, पटेल, आगरकर, टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र, किती नावे घ्यावी? यांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. यासाठी खरे स्वातंत्र्य म्हणजे काय ते लक्षात घ्यावे लागेल. बुध्दाने दिलेले विचार, महात्मा फुलेंचे व सावित्री आईचे योगदान, छत्रपती राजर्षी शाहूंनी दिलेले योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट, छत्रपती संभाजीराजेंचे बलिदान, अनेक शहिदांचे बलिदान, स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या संसाराची केलेली होळी. आंबेडकरांनी दिलेले अमुल्य संविधान. हे लक्षात नव्हे हृदयात ठेवले तर ती या सर्व महानुभावांना दिलेली स्वातंत्र्य वंदना होईल.
देशात हल्ली दिसणारी जातीय अंधता नष्ट व्हायला हवी. जात, कर्मकांड, धर्म हे वैयक्तिक असायला हवं. नाहीतर देशभक्ति वा देशप्रेम हे या दिवसाचं 'वन..डे' होईल. आम्ही नाहीच सुधारलो तर देशभक्ति अंतरात कष्टी होऊन म्हणेल...
चलो चलती हूं सोने,
अब
मै सोने जाती हूं..
अब उठूंगी छब्बीस जनवरीको
असं देशभक्तीला म्हणायची वेळ येऊ देऊ नये.
होय ना.?
- © स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)