विनामास्क रस्त्यावर फिराल तर याद राखा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

अहमदनगर - जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. 

नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सध्या जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात होता. त्यानंतर नागरिकांची बाहेरगावाहून ये-जा वाढल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे दक्ष आहे. 

सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये दरदिवशी ३०० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांनंतर प्रतिदिन एक हजार अशी होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !