पुणे - भक्तांचे लक्ष वेधून घेणारे भव्यदिव्य देखावे, रंगांची उधळण करणारी रोषणाई, अशी परंपरा जोपासणाऱ्या पुण्यातील प्रमुख ५० गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सवात मंडप न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ मंदिरातच छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून यंदा उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु, बाप्पांचे आगमन होणारच, असा निर्धारही मंडळांनी केला आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक रद्द करून गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी यापूर्वीच घेतला होता.
अखिल मंडई गणेश मंडळाने यंदा प्रथमच मंडळाच्या समाज मंदिरामध्ये शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये यंदा मंडप न उभारता मंदिरातच गणरायाची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले होते. त्याला गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे.
हुतात्मा बाबू गेनू मंडळ, हत्ती गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ या मंडळांसह शहराच्या विविध भागातील ५० गणेश मंडळांची बैठक झाली. हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या मंदिरामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सामाजिक भान राखणारी भूमिका घेत असल्याचे नमूद करीत आपल्या निवेदनाची प्रत त्यांनी पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे दिली.