'मैत्र' मुलांशी, आपल्याच 'फुलांशी'..!

'जागतिक फ्रेंडशिप डे' विशेष 

जागतिक पातळीवर विविध देशात वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रदिन साजरा करतात. दि. २७  एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य करण्यात आला. अनेक डे प्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये रुजविण्यात आला. भारतात अॉगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्रदिन तथा फ्रेंडशिप डे साजरा करतात.


मैत्री हे असं नाजूक नातं आहे की जे काळवेळ, शिक्षण, अनुभव सगळ्यात पुढे जाऊन पोचतं. मैत्री कुठल्याही व्यक्तीमध्ये होऊ शकते. त्याला वय, जात, भेद, लिंग याचा कुठलाही सबंध येत नाही. आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरचा कोणीही तुमचा मित्र होऊ शकतो. पण आज या घडीला गरज आहे ती पालकांनी आपल्या पाल्यांशी मैत्री करण्याची...!

पालकांनी मुलांशी मैत्री करायची म्हणजे काय करायचं? आपल्या पिलांशी बोबड्या बोलांपासून सुरु झालेला संवाद निरंतर ठेवणं.. जगाच्या प्रांगणात एकटे चालण्याइतपत त्यांचे हात मजबूत झाले, की त्यांचे हात आपल्या हातातून नकळत निसटून जातातच, पण तोपर्यंत त्यांची हृदयापासून प्राणपणानं सोबत करणं.. त्यांच्या हृदयाला स्पर्श करुन बांधिलकी राखायची, हाच तर मैत्रीचा अर्थ आहे.

सध्या मुलांसमोर वेगवेगळ्या माध्यमातून मालिकांमधून दाखविण्यात येणारे चंगळवादी राहणीमान पाहून मुलांची मानसिकताच बदलते आहे. वास्तव जीवनापेक्षा ते आभासी जीवन त्यांना खरं वाटतंय. यासाठी मुलांना वेळ देणं, त्यांच्याशी मैत्री करणं आवश्यक आहे. अर्थात.. आपला पाल्य उत्तम माणूस होण्यासाठी पालक म्हणून जी भूमिका असते, ती मित्र बनण्याच्या नादात सुटता कामा नये.

हे अवघड असलं तरी अशक्य अजिबातच नाही. त्यासाठी सतत ऐकवू नका, ऐकायलाही शिका. मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. यासाठी घरात मुलांसोबत दिलखुलास संवाद झाले पाहिजेत. शिस्त म्हणजे नियमांचे पालन करणे. प्राणी निसर्गाचे पालन करतात. पण माणूस निसर्गाचा वापर आपल्या उपजिवीकेसाठी करतो. माणूस निर्मितीशील आहे. निर्मिती करताना माणसाचं सत्व जाग होत. 

पालकांनी मुलांच्या चांगल्या गुणाचं आवर्जून कौतुक करावं. त्यामुळ त्यांच्यातील निर्मितीक्षम मन आणखीन उमेदीने कार्य करायला लागेल. मुलं चुकत असतील तर समजावून सांगावं. आपण काय केल तर मोठ्या माणसांना चालतं, काय केलेलं चालतं नाही, हे मूल वेळोवेळी आजमावत असतं. तशा सीमा आखून देणे, वर्तणुकीचा परीघ  आखणे, हे पालकांचे कर्तव्य ठरते.

पालकांनी नियम ठरवताना आपल्याला वाटतात म्हणून ठरविलेले नसावेत. आणखीन सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हांला आईबाबा व्हायचं होतं म्हणून तुम्ही मुलांना जन्माला घातलेली असतात. मुलं तुमच्या मागे लागलेली नसतात. माफ करा तुम्हांला माझा राग येईल. पण हेच खरं आहे..! तेव्हा त्यांच्या समोर "आमच्यावेळी असं होतं, आम्ही फारच काटकसरीत दिवस काढलेत.. तुला त्याचं काहीच नाही, तुला आयतंच मिळालं आहे, मी म्हणून तुमचा खर्च सहन करतोय.. असं तुणंतुणं सारखं ऐकवू नका.

तुमच्या त्यागाच, कष्टाचं, महत्व मोल रहाणार नाहीत. कधीतरी सहज सांगितल्यासारखे तुमचे कष्ट त्यांच्या कानावर जाऊ द्या. पण सतत अजिबात नको. ह्या समजंसपणे मुलांना समजून घेतलं तर आजची पिढी खूपच शहाणी, व्यवहारी आहे. ती नक्कीच तुम्हा-आम्हाला समजून घेईल. ज्या आपल्या छोट्या मुलांना आपण आईबाबा म्हणायला शिकवतो. त्यांच्या हाकांनी पुलकीत होतो.

शाळेत गेल्यावर मात्र जगाच्या भरवश्यावर त्याला सोडून देतो. त्यांच्या हांकानी सुरु झालेला संवाद चालू ठेवणं हे आईबाबा म्हणून आपल्याचं हातात आहे ना..! नाहीतर आयुष्याच्या संध्याकाळी मुलांविना एकटेपणा सोसायला लागेल. मुलांच्या तारुण्यसुलभ भावना जपून त्यांच्याशी बोलाल, तर पालक-मुलं यांच्यात मैत्रीचे घट्ट नातं निर्माण होईल. आणि घराघरात आनंदाचे मेळे साजरे होतील. करतांय ना मग मैत्रीदिन साजरा ?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
लेखिका कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !