मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच त्याच्या पैशांमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) रियाची सुमारे साडेआठ तास चौकशी केली. सुशांत मानसिक आजाराने त्रस्त होता, असे खोटे चित्र रियाने रंगवल्याचे तपासात समोर येत आहे.
रियाला सुशांतचे पैसे हडपायचे होते, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात रियाविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. त्याआधारे सुशांतच्या खात्यातून १५ कोटींच्या हेराफेरीबाबत ईडीने ३१ जुलैला रियाविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.
त्याबाबतच तिची चौकशी करण्यात आली. ईडीने रियाकडे तिच्या आणि सुशांतसोबतच्या व्यवहारांची चौकशी केली. तसेच आर्थिक गुंतवणूक, करार व संपर्काबाबतही तिला प्रश्न विचारले. दरम्यान, बिहार सरकारने सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केले होते.
त्यात म्हटले होते की, मुंबईत दाखल झालेला गुन्हा सुशांतच्या मृत्यूचा आहे. पण बिहार पोलिस सुशांतच्या फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची चौकशी करत आहेत. बिहार पोलिसांना त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे. रियाची याचिका रद्द करावी. त्यानंतर रियाची याचिका फेटाळण्यात आली.