बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मुलींना एक कॉमन अनुभव येतो. जेव्हा एखादी मुलगी उपवर होते तेव्हा तिला पाहुणे हे पाहायला येतात. खाऊन पिऊन जातात आणि वरून म्हणतात की 'ठीक आहे, तुमची मुलगी शिकलेली आहे. पण लग्नानंतर तरी किती दिवस ती जॉब करणार आहे ? एक दोन वर्षात तिलाही घरंच सांभाळावं लागणार आहे.'
किती पटकन ही स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी माणसे तिच्या भविष्याचं सुद्धा मत मांडून मोकळी होतात. एक मिनिटसुद्धा हा विचार करत नाहीत की, जिने इतकं शिक्षण घेतलं, तिला हे वाक्य ऐकल्यावर किती मन तुटल्यासारखं होत असेल. तिच्या भावविश्वाला किती धक्का बसत असेल, याचा कधी कोणी विचार केलाय का ?
आज महिला चंद्रावर जाऊन आल्यात. मात्र आजही सुशिक्षित कुटुंबातील नोकरीवाला प्रत्येक मुलगा लग्न करताना कधीच स्वतःची पसंत म्हणून पटकन मुलगी पसंत करून हो कधीच म्हणत नाही. बरेच महाभाग आहेत असे ज्यांना मुलीला किती संपत्ती आहे, किती हुंडा देतील, लग्न कसं करून देतील, हे प्रश्न आधी पडतात. नव्हे नव्हे, तर मुलाच्या आईवडिलांना तर खूपच चिंता असते या गोष्टींची.
खरंतर ही म्हणायला शिकलेली माणसं मुलगी पाहायला नाही, तिची किंमत करायला येतात. फार वेगळया क्षेत्राचं तर जाऊद्या माध्यमात काम करणारी मुलंच मुलींना म्हणतात तू कितीही शिकली तरीही तुला घरची धुणी-भांडी करावी लागणार आहेत. असं म्हणलं की मग आम्ही कसे मुलाच्या जन्माला येऊन महान आहोत, हे मुलींच्या भावना एक मिनिटात ठेचत म्हणतात.
काही असो, हे मात्र खरं आहे माणसे कितीही शिकली तरी मनातली घाण स्वच्छ करत नाहीत. म्हणजेच एकूणच परंपरा जपणाऱ्या कुटुंबात जन्म घेऊन मुलीला प्रत्येक गोष्ट आई वडिलांचा मान राखून करावी लागते. म्हणजे तिने आपल्या मनाने कुठल्याही जाती धर्मात लग्न करायचं नाही. हे लहानपणापासून मनावर बिंबवलं जातं. आणि त्यांच्या मर्जीने लग्न करायचं म्हणलं, की लोक तिची किंमत करून मोकळी होतात.
या सगळ्या कोलाहलात तिचं स्वतः च भावविश्व संपून जातं. तीही 'आलिया भोगासी असावे सादर 'म्हणून आई वडिलांना पसंत असलेल्या मुलाशी लग्न करायला 'हो' म्हणून गपगुमान आपल संपुर्ण आयुष्य वाहून टाकते. जोपर्यंत आपण 'सून' नाही, 'मुलगी' घरात आणणार आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजत नाही, तोपर्यंत जगातला हा प्रवाह आपण बदलू शकत नाही. आणि असंच राहिलं तर मागून आलंय तेच पुढं होत राहिल.
कटू आहे पण सत्य आहे.
- प्रियंका पुंड, अहमदनगर