नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
नाशिक - अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविंद्र कर्डिले असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कर्डिले याच्याविरुद्ध अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या मोटारसायकल दुरुस्तीच्या दुकानावर पत्ते खेळण्यावरुन क्लबची केस न करण्यासाठी कर्डिले यांनी लाच मागितली. तसेच तक्रारदाराच्या वडिलांना आरोपी न करण्यासाठी पंचांसमक्ष २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याचवेळी पंचांनी इशारा करताच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, हेड कॉन्स्टेबल सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, सुनील गिते, चालक शिंपी आदींच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे या शाखेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नगर जिल्हा दौऱ्यावर आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत काही बैठकाही होणार होत्या. त्याच वेळी या कारवाईची वार्ता पसरली. स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त वेगाने पसरले. परंतु, स्थानिक पोलिसांकडून काहीही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे या कारवाईबाबत उलटसुलट चर्चाही सुरु होती.