सीरम इंस्टीट्यूटचा बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि गावीसोबत करार
नवी दिल्ली - गेले काही महिने देशात थैमान घातलेल्या कोरोनाने लाखो जणांचे बळी घेतले आहेत. या विषाणूला रोखणारे औषध बाजारात नसल्याने अक्षरश: तीन महिने देशभरात संचारबंदी जाहीर करावी लागली. पहिल्यांदाच सगळं काही ठप्प झालं. पण अखेर एक चांगली बातमी समोर आली आहे. सगळ्यांच्या जीवाला घाेर लावणाऱ्या कोरोना आजारावर प्रतिबंधक करणारी लस अखेर गवसली आहे.
ऑक्सफोर्ड व्हॅक्सीन तयार करणाऱ्या 'सीरम इंस्टीट्यूट'ने ही चांगली बातमी दिली आहे. 'सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया'ने 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' आणि 'व्हॅक्सीन अलायंस संस्था, 'गावी' यांच्यासोबत करार केला आहे. त्यानुसार, भारत आणि कमी उत्पन्न असलेल्या ९२ देशांना फक्त २२५ रुपयात ही लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती दिली आहे.
ही लस तयार करण्यासाठठी गेट्स फाउंडेशन 'गावी'ला फंड उपलब्ध करुन देणार आहे. याचा वापर सीरम इंस्टीट्यूट कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी करणार आहे. या लसीची मानवी चाचणी यशस्वी होताच ही लस बाजारात उपलब्ध होईल. 'सीरम इंस्टीट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
'गावी' ही गेट्स फाउंडेशनची एक संस्था आहे. गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशांना कमी दरात लस पुरवण्याचे काम ही संस्था करते. लसीचे वितरण 'कोव्हॅक्स स्कीम' अंतर्गत केले जात आहे. या अभियानाचा उद्देश जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील लोकांपर्यंत कोव्हिड-19 ची लस पोहचवणे हा आहे. या योजनेचा हेतू सन २०२१ पर्यंत २०० कोटी लोकांना या लसीचा पुरवठा करण्याचा आहे.
या कोरोना प्रतिबंधक लसीची आधी मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली जाईल. 'नॅशनल बायोफार्मा मिशन' अँड 'ग्रँड चॅलेंज इंडिया प्रोग्राम'अंतर्गत सरकार आणि 'मेलिंडा गेट्स फाउंडेशन' यांच्यात करार झाला आहे. या लसीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी अनेक संस्थांची निवड झाली आहे. यात हरियाणा, पुण्यातील केईएम हॉस्पिटल, हैदराबादच्या सोसायटी फॉर हेल्थ एलायड रिसर्च अँड एजुकेशन, चेन्नईचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि वेल्लोरचे क्रिश्चियन मेडिकल कॉलेज यांचाही समावेश आहे.