'लॉकडाऊन'मध्ये १९ कोटी ६२ लाखांची दंडवसुली

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

राज्यात २ लाख २४  हजार गुन्हे

                                    अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख १७ हजार पास                                 

मुंबई :  राज्यात दि.२२ मार्च ते ८ ऑगस्ट या लॉकडाऊनच्या काळात कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २४  हजार गुन्हे दाखल केले असून १९ कोटी ६२ लाख ३४  हजार ९९४ रुपयांची दंड वसुली करण्यात आली. तसेच ३२,९८९ व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख १७  हजार ३९४  पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

 देशमुख म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.  या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३२९ घटना घडल्या. त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या शिवाय  अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर ९५ हजार ५७५ वाहने जप्त करण्यात आली.

१ लाखहून अधिक वेळा खणखणला  १०० नंबर

 पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १ लाख ०९ हजार ६६६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर 'क्वारंटाईन' ( Quarantine ) असा शिक्का आहे अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले, असेही  देशमुख यांनी सांगितले. 

कर्तव्यावरील ११५ पोलीस बांधवांचा मृत्यू 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ५२ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५६, ठाणे शहर १३  व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १ ,सोलापूर शहर ३, अमरावती शहर १  डब्ल्यूपीसी, मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३, जळगाव ग्रामीण १, जालना एसआरपीएफ  १ अधिकारी, नवी मुंबई  एसआरपीएफ अधिकारी १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर ३, जालना  १, नवी मुंबई २, सातारा १, अहमदनगर २, औरंगाबाद रेल्वे १,  एसआरपीएफ अमरावती १, पुणे रेल्वे अधिकारी१,  पीटीएस  मरोळ अधिकारी १, एसआयडी मुंबई १, नागपूर २, बीड १ अशा ११५ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २३४ पोलीस अधिकारी व १ हजार ७०९ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना लढाईत नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक 

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन देखील देशमुख यांनी केले.

(आमचे फेसबुक पेज लाईक करा)

(आम्हाला ट्विटरवर फॉलो करा)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !