शाळेत असल्यापासून ऐकलेले एक उदाहरण आठवतेय. जर एखादा ग्लास अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे तर आपण नेमके काय पाहतो, यावर आपली विचारसरणी ठरत असते. ग्लास अर्धा भरलेला आहे हे पहिले, तर सकारात्मक विचारसरणी आणि अर्धा रिकामा पहिला तर नकारात्मक विचारसरणी. इतका साधा सरळ या उदाहरणाचा अर्थ आहे.
नुकतंच प्रवीण तरडे यांनी 'पुस्तकरूपी बाप्पा' ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत भारतीय संविधानावर गणपती बाप्पा बसविले. आणि आपल्याकडे जसे नेहमी होते त्याप्रमाणे ते काही 'तज्ञ' देशभक्तांकडून ट्रोल झाले. ज्यांनी तरडे यांना ट्रोल केले, कदाचित त्यांनी लहानपणापासून ग्लास अर्धा रिकामा आहे, हेच पाहिले असावे. म्हणून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.
मुळात भारतीय संविधान हे काय फक्त कोण्या एका विशिष्ट वर्गाचे किंवा समुहाचे नाही. तर भारतातील सर्वच लोकांच्या भावना त्याला जोडलेल्या आहेत. परंतु त्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला नाही. याचा अर्थ कदाचित त्यांनी ग्लास अर्धा भरलेला आहे, असे पाहिले असेल. बुद्धीच्या देवतेकडून संविधानाचे ज्ञान असाही अर्थ घेऊ शकत होतो आपण. पण द्वेष हा माणसाला सकारात्मक विचार सुचवू देत नाही.
काहीही झालं तरी प्रत्येक गोष्टीत एखाद्या समुहाचा द्वेष करणे खरंच गरजेचे आहे का ? बरं महापुरुषांनी आजवर जे काही विचार मांडले, त्यात माणसाला माणूस म्हणून वागावं, हाच संदेश दिला आणि स्वतःही तसे वागले. परंतु त्यांच्या नावावर आपण आजकाल हे जे काही पराक्रम करत आहोत, ते पूर्णपणे त्यांच्या विचारांना मातीत घातल्यासारखे आहे.
स्वामी विवेकानंदांच एक उदाहरण आहे. भगवद्गीता इतर धर्मग्रंथांच्या खाली ठेवली होती, तेव्हा सगळे पाश्चात्य तज्ञ विवेकानंदांना हिणवत होते, पण विवेकानंदांनी त्या हिणवणाऱ्ऱ्यांना नम्रपणे सांगितले, माझी भगवद्गीता ही सर्व धर्मांचा पाया आहे, म्हणून ती खाली आहे, पण मी जर आत्ता ही गीता काढून घेतली, तर वरचे सगळे ग्रंथ खाली पडतील..
आज भारतीय संविधानावरून वाद.. उद्या महापुरुषांवरुन वाद.. परवा अजून काहीतरी नवीन असेल.. असे करून आपण काही संधीसाधू लोकांना आयते कोलीत देत आहोत, हे आपल्या का लक्षात येत नाही ? जातीय द्वेष बाजूला ठेऊन एकदा ग्लास अर्धा भरलेला आहे, हे पाहायला काय हरकत आहे ?
- योगिता सूर्यवंशी (अहमदनगर)