नाशिक - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या केसवरुन राज्यातील राजकारणही चांगलेच तापलेले आहे. पार्थ पवार आणि शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या राजकारणाला आणखीनच फोडणी मिळाली आहे. पवार कुटुंबातील वादामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही पार्थला उद्देशून 'नया है वह', अशी टिपणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी 'माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही', अशा शब्दांत फटकारले. यानंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ यांना पार्थ पवारांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर 'नया है वह' असं ते म्हणाले. यासोबतच पवार कुटुंबातील सध्याच्या परिस्थितीविषयीही त्यांनी भाष्य केलं. भुजबळ म्हणाले की, ' पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत.
या प्रकरणामुळे अजितदादा किंवा इतर कोणीही दुखावलेले नाहीत, सर्व जण एकत्रित आहोत. असे म्हणत छगन भुजबळांनी कुटुंबातील कलहाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पवार कुटुंबातील वादामुळे राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलेले आहे..(image source : TWITTER)