पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गणेशोत्सव काळात नागरिकांनी गर्दी टाळावी आणि या काळात प्रशासनाच्या पातळीवर संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना सहकार्य करावे. त्यासोबतच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी बैठकीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याने जिल्ह्याचा कोरोना बाधित रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर ही 2.56 टक्के झाला आहे, असे मंत्री त्यांनी सांगितले.