अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे गेले वर्षभरापूर्वी नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी लोकवर्गणी करुन सीसीटीव्ही बसवले. गावात येणारे प्रमुख रस्ते, नगर औरंगाबाद महामार्ग व संवेदनशील ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवलेले आहेत. जेणेकरुन सोनई पोलिस व घोडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील घडामोडी थेट पाहता येऊन अनुचित प्रकारांना आळा बसेल. परंतु, हे सीसीटीव्ही सध्या फक्त देखावे झाले आहेत.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने व घोडेगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार केला. सर्वांनी त्याला सहमती दर्शवली. त्यानुसार सर्वांनी लोकवर्गणी करुन गावात एकूण सुमारे ८ ते १० ठिकाणी सीसीटीव्ही बसवले. परंतु, पुढे या कॅमेऱ्यांचा मेंटेनंन्स न केल्यामुळे नंतर काही दिवसांतच ते बंद पडले. याकडे पोलिस यंत्रणेचेही दुर्लक्ष झाले आहे.
गावातील सीसीटीव्ही बंद पडले असल्याची बाब ग्रामपंचायतीने सोनई पोलिसांच्या कानावर घातली होती, असे प्रशासनाचे म्हणे आहे. बसवलेल्या कॅमेऱ्यांचा मेंटेनंन्स करायचा कोणी, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. ज्या खासगी व्यक्तीला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कंत्राट दिले होते, त्यानेही नंतर याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
चोर आले रे आले SS..
गेले काही दिवसांपासून घोडेगावात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मध्यंतरी भर वस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. एका घरांतून सोन्याचे दागिने, एका घरासमोरुन दुचाकी मोटारसायकल, तर एका घरातून रोकड चोरुन नेली. एक पानटपरीही फोडली. तसेच एका होमगार्डच्या घरातच चोरी झाली होती. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल आहेत.
ग्रामस्थांच्या सुरक्षेचं काय ?
सीसीटीव्ही बसवल्यानंतर गावकरी व व्यावसायिक काहीसे निर्धास्त झाले होते. परंतु, गावात बसवलेले सीसीटीव्ही बंद असल्यामुळे आता गावकरीही भेदरले आहेत. आधीच मनुष्यबळ कमी, त्यात घोडेगावसह इतर गावांची सुरक्षेची जबाबदारीही सोनई पोलिसांवर आहे. घोडेगावात चौकी असली तरी तेथे चोवीस तास पोलिस कर्मचारी नसतो. त्यामुळे गावकऱ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे.