समाजासमोर ठेवला आदर्श, रक्तदान श्रेष्ठ दान
पिंपरी-चिंचवड - निगडी (पुणे) मधील अजठानगर येथील अपंगांच्या एका संस्थेतील तब्बल ७० जणांनी रक्तदान करून सुदृढ माणसांच्या डोळ्यात अंजन घातले.
कोरोना संकटात वाढती रुग्णसंख्या पहाता रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. भविष्यातील संकट पाहता मोठ्याप्रमाणात रक्तसाठा उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. ही दूरदृष्टी ठेऊन रिपाई (आठवले गट) वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख व सामाजिक कार्यकर्ते हाजी नायर यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले आणि तसे आवाहन परिसरात केले.
या हाकेला साद देत अजठानगर येथील अपंगांच्या संस्थेने रक्तदान करण्यासाठी पुढाकार दर्शविला. त्यानुसार येथे अनोखे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तब्बल ७० अपंग बांधवानी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. शिबिरात सहभागी अपंग रक्तदात्यांना पोलीस उपायुक्त ढाकणे यांच्याहस्ते धान्य, छत्री व टॉवेलचे वाटप करण्यात आले.
ससून रुग्णालयातील रक्तपेढीच्या पथकाच्या मदतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. श्री. अजीज शेख यांच्या प्रयत्नातून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या रक्तदान शिबिरात ७५ पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. इंद्रायणी नगर येथिल शिबिरात ११६ जणांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांची ने-आण करण्यासाठी 'बुक टू राईड'चे सहकार्य लाभले.