जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राजकारणात फारसे सक्रीय नसले, तरी ते बोलायला लागले की खळबळ उडतेच. सध्या नाथाभाऊ पुन्हा एकदा भडकले आहेत. पक्षात त्यांच्यावर अन्याय होतोय म्हणून नाही, तर वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्यामुळे एकनाथ खडसे भडकले आहेत. अचानक लाखांत आलेले वीजबिल पाहून खडसे यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे.
नुकतेच महावितरणने खडसे यांना एक लाखाचे वीज बिल पाठवले आहे. त्यामुळे खडसे चांगेच संतापले आहेत. आपल्यालाच नाही, तर नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. महावितरणने खडसेंना एप्रिल ते जुलै महिन्याचे वीजबिल १ लाख ४ हजार रुपये पाठवले आहे. हे बिल पाहून खडसे यांनी आपल्या राग व्यक्त केला आहे.
खडसे यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करुन त्यात आपले म्हणणे मांडले आहे. महावितरणने भरमसाठ बिल पाठवून सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. सामान्यांना वेठीस धरू नये. ग्राहकांना सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खडसे यांनीच आता महावितरण कंपनीवर आगपाखड केली असल्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागणार आहे.