मेथीची भाजी चवीला कडू असली तरी मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे आहेत. या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाबाला प्रतिबंध होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात मेथीची भाजी खाण्याचे फायदे अनेक आहेत.
मेथीच्या भाजीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात असतात. या भाजीच्या पानांची पालेभाजी रुचकर तर आहेच. शिवाय अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.
मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावा, कोंडा लवकर संपेल. मेथीच्या भाजीत गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी उपयोगी आहे. मेथीची भाजी खाल्ल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक व पचनक्रिया सुधारते.
मेथीच्या भाजीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. तसेच तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.