'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस' रोखणार महिला अत्याचार

 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण 

मुंबई -  बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा 'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस' हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.


महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या 'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस' या वेबॲपचे अनावरण ॲड. ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, 'अक्षरा' संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील संरक्षण अधिकारी, महिला विशेष कक्षांचे अधिकारी, समुपदेशक उपस्थित होते.
 
यावेळी मंत्री ठाकूर म्हणाल्या, लॉकडाऊनमधे जनजीवन ठप्प असताना संपुर्ण जगात महिलांवरचे अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षा मिळवून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही आपली प्राथमिकता होती. शासनाची यंत्रणा, हेल्पलाईल क्रमांक महिलांना मदत करत आहेतच, यासोबत ॲप सारख्या माध्यमातून महिलेच्या घरात, हातात जर सुरक्षेचे साधन देता आले तर नक्कीच अनेक घटनांना आळा बसेल असा विचार समोर आला. यादृष्टीने या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपल्या राज्यातला असा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगत 'अक्षरा' संस्थेचे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या टाटा सामाजिक संस्थेचे त्यांनी आभार मानले. महिलांनी व्यक्त व्हावे, अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन करत एकत्रित प्रयत्नांनी हिंसाचाराच्या घटना रोखता येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस' हे वेबॲप https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाईलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमधे जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तात्काळ मदत करु शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून ॲपद्वारेच त्यांना दुरध्वनी करता येईल. यात मदत मिळाली नाही, संपर्क होऊ शकला नाही तर तसा अभिप्रायही नोंदवता येईल. अभिप्राय नोंद केल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल. सध्या इंग्रजीमधे असलेले ॲप लवकरच मराठी भाषेत ही उपलब्ध असेल.

महिला व बाल विकास सचिव आय. ए. कुंदन यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करत असताना या वेबॲपची मोठ्या प्रमाणावर मदत होईल असे सांगत याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.

यावेळी उपायुक्त हिवराळे यांनी, संकटग्रस्त महिलांना मदत नक्की कशी मिळेल, कोण करेल याची बरेचदा माहिती नसते, आणि या माहितीच्या अभावामुळे ही त्या होणाऱ्या त्रासाविरोधात दाद मागत नाहीत. तेव्हा आपण महिलांपर्यंत पोहोचावे या हेतुने ॲपची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. संरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाधिक महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले.
 
'अक्षरा'च्या सहसंचालिका नंदिता गांधी यांनी महिलांना नव्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्याच्या निवारणासाठी आपल्यालाही आपल्या उपाययोजनांमधे बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलांसोबत जायला हवे असे सांगत ॲप निर्मिती मागची पार्श्वभूमी सांगितली. श्रीमती तृप्ती झवेरी यांनी लॉकडाऊन काळात संस्थेकडून करण्यात आलेल्या मदतकार्याचा गोषवारा सादर केला.  महिलांसाठीच्या विशेष कक्ष हेल्पलाईनला गेल्या पाच महिन्यात तब्बल वीस हजार फोन आल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार, हिंसाचारासह इतर अडचणी, समुपदेशन यासाठी हे दुरध्वनी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नंदिता शाह यांनी केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !