बीड - पोलिस दलातील 'रॉकी' या श्वानाचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. अनेक गुन्ह्यांच्या किचकट तपासाची उकल करण्यात रॉकीची महत्वाची भूमिका होती. रॉकीने आजपर्यंत तब्बल ३६५ गुन्हे उघडकीस आणले होते. या जिगरबाज श्वानाचे निधन झाल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख देखील हेलावले आहेत. त्यांनी रॉकीला श्रद्धांजली वाहताना त्याच्या शौर्याचे कौतुक केले.
अनिल देशमुख म्हणाले, रॉकीच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त आदी विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिस दलातील श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलिस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत.
बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलिस दलाच्या मनात सदैव घर करून राहील, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.