नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. परंतु, तरीही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. त्यामुळे आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आणखी निर्णय घेतला आहे.
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून राज्यातील सर्व किराणा दुकानदार, त्यांच्याकडील कर्मचारी, भाजीपाला विक्रेते आणि इतर सर्व विक्रेत्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
यापैकी कोणाची चाचणी न झाल्यास त्याच्यामुळे इतर जणांनाही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकारच्या म्हणणे आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, सर्व राज्यांनी ऑक्सिजन सुविधा आणि तत्काळ रुग्णवाहिका सेवेची सुविधा करावी. तसेच रुग्णवाहिकांची वेळोवेळी देखरेख ठेवावी.
जेणेकरुन ऐनवेळी अडचणी येणार नाहीत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २१ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आजवर देशात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ लाखांवर रुग्ण बरे झाले आहेत.