मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देखील पवार यांनी दिली. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यांचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.
सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ठ्ये
- २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
- रेल्वेमार्ग पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून
- रेल्वेचा प्रतितास २०० कि.मी. वेग
- पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढवणार
- पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासांचे
- वेळेसह इंधनाची बचत
- पर्यावरण पुरक प्रकल्प.
- पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानके
- १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल
- एकूण १२८ भूयारी मार्ग
- प्रवासी आणि मालवाहतुक
- रेल्वेस्थानकात प्रकल्पबाधितांना प्राधान्य
- प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी
- प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था
- २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा
- कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार.
- विद्युतीकरणासह
- एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम