१८ हजार नागरिकांवर गुन्हे, दिवसाला शंभर कारवाया
नाशिक: शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक मात्र निष्काळजीपणाने फिरत असल्याचे दिसत आहे. मोकाट फिरणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. दररोज किमान शंभरावर नागरिकांवर मास्कचा वापर न केल्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मास्क वापरणे बंधनकारक केल्यापासून तब्ब्ल १७ हजार ९५३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना रूग्णांसह करोनामुळे बळी जाणार्यांची संख्या वाढते आहे. अर्थकारण सुरू ठेवायचे आणि करोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करायचा अशी दुहेरी कसरत जिल्हा प्रशासन करीत आहे. दुर्दैवाने त्यास अद्याप यश मिळालेले नाही. त्यात करोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते आहे.
सामाजिक अंतर आणि मास्क वापर याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते आहे. मास्कचा वापर न करणार्या नागरिकांची संख्या मोठी दिसून येते. पोलिस गस्ती दरम्यान सरासरी दिवसाकाठी शंभर नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई केली जात आहे.
एप्रिल, मे या महिन्यांमध्ये एकाच दिवसात सहाशेपेक्षा अधिक नागरिकांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे. करोनाची लक्षणे बदलत असून, आता फ्लूची कोणतीही लक्षणे आढळून येत नाही. त्यामुळे आपल्याला करोना नाही किंवा होणार नाही, या विचारातून बाहेर पडून नियमांचे पालन करावे, असे पोलिसांनी सांगितले.