हिंदुस्तान लिव्हर कंपनी ने त्यांच्या फेअर अँड लवली या क्रीम नावातून फेअर हा शब्द काढून टाकला. अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे हे... रंगभेद/वर्णभेदाच्या भिंतीनी माणसाच्या मनामनात दुरावा निर्माण केला.आता परवा अमेरिकेत झालेल्या घटनेने पूर्ण जग ढवळून निघाले होते. पण त्या वर्णभेदा विरुध्द आवाज उठवणारी लोक अन लोकशाही जगाने पाहिली.
फेअर अँन्ड लव्हली या कंपनीच्या विरोधात अभिनेत्री नंदिता दास आणि कंगना हिने याचिका दाखल केल्या होत्या. वर्णभेदाला या कंपन्या बढावा देतात असे त्यांचे म्हणणे होते. आणि ते खरंही होते. नेल्सन मंडेला, गांधीजी, बॉक्सर मंहमद अली अशा कितीतरी मोठ्या माणसांना वर्णभेदामुळे अपमानित व्हावं लागलं आहे. भारतीय लोक मूळातच गव्हाळ रंगाचे आहेत.
या रंगाविषयी अशी न्युनगंडता बाळगणे म्हणजे मुर्खपणाच वाटतो. त्वचा आरोग्यपूर्ण, रसरसशीत असेल तर तो रंग कुठलाही असेना ती व्यक्ति सुंदरच दिसते. पाश्चात्त्य स्त्री-पुरुषांना आपल्या तेजस्वी सावळ्या रंगाचे कोण कौतुक.. म्हणून तर समुद्र किनारी उन्हात पहुडलेले लोक दिसतात. गो-या रंगाचं कौतुक, अप्रुप करुन माणसाच्या या दृष्ट झुंडी समोरच्याचे मानसिक खच्चीकरण करत असतात.
माणसाची बुध्दीमत्ता स्वभावाचे रंग आणि माणुसकीचा सुरेखसा रंग याने माणूस घडलाय ना..? कातडीवरच्या रंगाचं काही असो, पण आतून...? शरीरभर उसळत असलेलं रक्त मात्र सा-यांचेच लालच असते ना..! पाण्यासारखे रंगहीन असत का कोणी ? पाणी ज्या रंगात मिसळते त्याचेच होऊन जाते. पण पाण्याची निर्मळता.. सतत प्रवाही असण्याचा गुण आपण का बर घेत नाही ?
आता कोळसा असतो काळाकुट्ट पण तोच अग्नि होतो तेव्हा तो लालभडक होतो.. तसंच क्रोधाचंही आहे की नाही.. राग आला की माणूस आपला मूळ रंग विसरतोच त्याबरोबर विवेकही गळून पडतो अन काय बोलतो, काय करतो यावर नियंत्रण विसरुन बसतो.
एक पुराणातील कथा सांगते, अशोकवाटिकेत जेव्हा सीतेचा शोध घ्यायला हनुमानजी जातात तेव्हा हनुमानांना सर्व फुलं लालभडक दिसतात म्हणे. पण प्रत्यक्षात तिथे पूर्ण अशोकवाटीका पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेली असते. कारण काय असावं बरं ? क्रोध...!!! हनुमानजींच्या अंर्तमनातील क्रोधामुळे त्यांना सर्व लालभडक दिसत होते म्हणे.. अर्थात क्रोधाचा रंग लाल असतो केवळ हे सांगण्यासाठी, हे उदाहरण आहे.
तुमचा बाह्यरंग कोणता का असेना पण अंर्तरंगात तुम्ही बुध्दांच्या करुणेचा रंग, श्रीकृष्णाच्या अशरिरी निस्वार्थ प्रेमाचा रंग, गांधीजीच्या सत्याचा रंग, शिवरायांच्या क्षमेचा रंग, महावीरांच्या शांतीचा रंग... या सर्वांच्याच रंगाची जोपासना आपल्यात जोपासना करणार असू तेव्हाच रंगेल माणूसकीच्या रंगाची अनोखी रंगपंचमी ...!!!
माझ्या तेजस्वी सावळ्या रंगाचा मला अभिमानच आहे...! कारण जीवनाच्या माणुसकीच्या रंगात मी रंगते रोज....!!! आणि म्हणते रंग माझा वेगळा.....!!!
© स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री आहेत.