मुंबई - राज्यभरात उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. हा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. अभ्यासक्रम कपातीचा निर्णय फक्त २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापुरताच असेल, असेही त्यांनी सांगितले केले. वगळलेल्या अभ्यासक्रमाचे वर्षभरातील कोणतेही अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार नाही.
शैक्षणिक वर्ष दरवर्षी जून महिन्यात सुरू होते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे फक्त ऑनलाइन स्वरूपात अंशत: सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर अपुऱ्या कालावधीत अभ्यासाचे दडपण येऊ नये, यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्या परिषद, बालभारती आणि राज्य शिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार पाठ्यक्रम कमी करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या. .
डिजिटल व्यासपीठाची उपलब्धता सर्वत्र नसल्याने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव विद्या परिषद (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) मार्फत देण्यात आला होता. राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी देऊन २५% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे एकूण १०१ विषयांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी
२२ - प्राथमिक विभाग
२० - माध्यमिक विभाग
५९ - उच्च माध्यमिक विभाग
सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध : इयत्तानिहाय आणि विषयनिहाय जो २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, त्याची सविस्तर माहिती www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळांवर उपलब्ध केली जाणार आहे. भाषा विषयातील गद्य, पद्य व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळला आहे.