नवी दिल्ली - सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे राज्यपाल कलराज मिश्रा यांना भेटण्यासाठी गेले आहेत. काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, सकाळी १० वाजता काँग्रेसच्या आमदारांची पुन्हा एक बैठक बोलवण्यात येणार आहे. आम्ही पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना विनंती केली आहे.
पायलट यांच्या समर्थक आमदारांनी राजकारणाच्या सद्यस्थितीवर चर्चा करावी. कुणा एका व्यक्तीविरोधात तक्रार असेल तर तेही सांगावे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी सर्वांचं म्हणणे ऐकायला आणि त्यावर तोडगा काढायला तयार आहेत. परंतु तरीही पायलट यांची हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.