मुंबई - राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे
यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यात हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले.
पण शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये यासाठी राज्यात सीसीआयचे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघाची नियुक्ती करण्यात आली. सर्वप्रथम राज्यामध्ये ४० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.
राज्यात प्रथमच जून व जुलै महिन्यामध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून एकूण ४६०० कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली. बहुतांश कापूस हा खरीप २०२०-२१ च्या पेरणी पूर्वी खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांची देयके देखील तत्पूर्वी देण्यांत आली आहेत.